Sunday, 26 June 2022

धमाल राजू

साडीची घडी करायला घेतली की हटकून तो आठवतोच, साडीची घडी कशी घालावी हे सांगणारा. ते सांगताना हातात साडी नसते पण असा बेमालूम दाखवतो घडीचं प्रात्यक्षिक की ज्याचं नाव ते. मुलांना शिकवता शिकवता त्याने आईलाही शिकवलं. मीही शिकलेच. चष्मा कसा धरावा म्हणजे त्याची काडी वाकणार नाही याचं शास्त्र चष्मेबहाद्दरांना न सांगता त्याने मुलांना सांगितलं. पहिल्यांदा भेटला तो मेळघाटावरील लिखाणातून. नंतर म्हणाला, "भेळ हे आंतरभारतीचा नमुना आहे." पटवून देण्यात वस्ताद. 'धमाल' करण्यात मग्न. प्रत्यक्ष त्याची भेट झाली ती जळगावी. लेखक जयंत पाटील यांच्याकडे. मी काहीतरी सादर केलं होतं.  तेव्हापासून मैत्रीचा हात पुढे. मग शाळेत कार्यशाळा घ्यायला आला.

 वलयांकित नाव राजीव तांबे. सोबत त्याच्या चिनी म्हणी म्हणून खपवलेल्या स्वतःच्या झणझणीत अंजनघालू ओळी. 'मुला बोले, आईबापा लागे' छापाच्या. उंचीच्या प्रमाणात जरा जास्त गुबगुबीत ( तो रागावणार नाही.)असा राजीव एक भला मित्र आहे. पहिल्यांदा घरी मुक्कामाला आला, कुरकूर न करता राहिला. जमिनीवर पथारीही त्याला चालली. भरपूर पुस्तकं घेऊन आला, आजवर त्याने हिशोब विचारला नाही. त्याच्या बोलण्याने मुलं खूष, पालकही खूष. क्रियापद शिकवणार ते लक्षात राहणारच. 

कित्ती फिरतो हा धमाल राजू! चष्म्याआडून त्याचे डोळे विसंगती, चमत्कृती हेरत असतात. विषयही एक का असतो ? सगळ्या विषयांवर सहज बोलतो. सोप्पंय म्हणतो. बहुधा विषयच त्याच्याकडे येत असावेत, आम्हाला गोंजार रे, सोपं कर जरा असं म्हणत. तो तसं करतोही.

त्याच्याशी बोलायला लागलो की माणूस ताजा होणारच. वादच नाही. त्याच्या एकूण वागण्यावरून तो जरासा गबाळा आहे असं वाटतं. पण नाही,तो एकदम शिस्तशीर, वक्तशीर आहे. स्वतःच्या शिक्षणाचा उल्लेख तो बरेचदा करतो खरा पण कुणीच ते लक्षात घेत नाही.कारण तो सगळ्याच्या पार, मुलांमध्ये रमणारा,गाढ स्नेह राखणारा गोबरा धमाल राजू आहे. त्याच्या सोबत शुभलक्ष्मी आहेच, आपुलकी असणारी.

       डॉ. मेधा उज्जैनकर,

       धुळे.


Wednesday, 25 May 2022

एक गोड म्हातारा....


 हा गोड म्हातारा १९९१ पासून माझ्या खनपटीला बसला आहे.त्याला ९१ मध्ये भेटले काय आणि बास!पण तेव्हा तो म्हातारा नव्हता.त्याच्या नावाभोवतीचं वलय,मी त्याला भेटायला जाणार आणि गेले.महात्मा फुले वस्तु संग्रहालयाच्या कार्यालयात.थेट त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसवून घेतलं.चर्चा कशावर तर परिभाषेवर.परिभाषा हा शब्द मला त्याच्यापर्यंत घेऊन गेला.तेव्हापासून जो त्याचा हात धरलाय तो काय सोडायला?

     स्पष्ट विचार,थेटपणे बोलणं,मध्येच मिश्किल टिप्पणी करणं,सगळ्यांना अरे म्हणून बोलावणं पण मला मात्रहा आत्ता आत्ता अग म्हणू लागलाय. लहानपणापासून हेवा वाटावा इतका वाचतोय.आण मग लिहितो कधी? त्याची पुस्तकं येतातच आहेत.त्यात खंड नाही. विषय कुठलाच वर्ज्य नाही पुन्हा.स्वतः वाचायचं पण लोकालाही सवय लावायची हे छान जमतं त्याला.एक दिवस शहाणपणा करून मी त्याला म्हटलं,"मी तुमची पुस्तकं आवरून देते." म्हणे,"आवर." मी फक्त मनातल्या मनात आवरली पुस्तकं. कोणतं पुस्तक कुठे आहे,कशावर आहे सगळं मेंदूत फीड केलेलं. दगडधोंड्यांचा मास्तर असलेला हा म्हातारा पोस्टाच्या तिकिटावरही बोलतो, सिनेमावरही बोलतो,प्रेमावरही बोलतो, युद्धावरही बोलतो,विज्ञान तर हातखंडाच.तो क्रिकेटवर लिहितो,इतर खेळांवर लिहितो.काही गरज आहे इतकं सगळ्याच क्षेत्रात शिरायची?इतकी जिवावरची आजारपणं झेलून?नवीन काहीतरी चालूच.कुणी आपणहून त्याचा हात सोडला तरच,नाहीतर ज्याने याचा हात धरला तो तरून जातोच.निरनिराळ्या परिषदांच्या आयोजकांना नाव सुचवेल,पारितोषिक समितीला नाव सुचवेल आणि समोरच्याला इतका विश्वास की याने सुचवलेल्या नावाला ते सन्मानित करतीलच.कुणा अभ्यासकाचा विषय लक्षात ठेवून त्याला संदर्भ देणं,पुस्तकं राखून ठेवत ती आठवणीने देणं हे तो सहज करतो.बोलणं परखड.एक बरंय,कुणी या गोड आणि खडूस म्हाताऱ्याचं नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुचवत नाही ते.आयोजक गारद होणार म्हणजे होणार.
    त्याच्या चित्रशाळेच्या फ्लॅटवर आम्ही गेलो होतो,जमिनीपासून छतापर्यंत पुस्तकच पुस्तकं.जीव दडपलाच.आज मी हक्काने पुस्तकं आणते, परत नाहीच करत. तेव्हा असलेलं निरंजन घाटे या नावाभोवतीचं वलय,दबदबा आणि माझं नवखेपण.आता मी निर्ढावलेय.(त्याला मी गोड म्हातारा म्हणतेय त्यावरून लक्षात आलंच असेल.)केव्हाही त्याच्या घरी जाते.सविताताईंच्या हातचा छान चहा पीत,खायलाही असतं,गप्पा होतात.म्हणजे बोलतो हाच, माझी श्रवणभक्ती.त्याच्याशी असलेल्या इतक्या वर्षांच्या स्नेहाच्या जोरावर मी बाहेर मोठेपणा मिरवते.
   माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्याला बोलवायला गेले.तब्येत यथातथाच होती.पण येतो म्हणाला.थोड्या वेळाने तब्येतीमुळे जमणार नाही,भाषणाचा व्हिडिओ पाठवून देतो म्हणाला.मला ते दिसत होतच.त्यासाठी हॉलमध्ये सगळा जामानिमा केला.आणखीही मान्यवर येणार होते.एकदम धाकटा मोठ्याने म्हणाला,"आई,बघ कोण?"मी दाराशी.पाहते तर सविताताईंच्या मागे काठी टेकत साक्षात हा बाबा रिक्षातून उतरून येतोय.मनातल्या मनात ढोलताशे वाजवून घेतले.हा गोडुस म्हातारा आला, पुस्तकाचं प्रकाशन केलं, नेहमीप्रमाणे कौतुक केलं.गेला.
   २७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्याला गौरविण्यात येणार आहे.निर्लेप वृत्तीने तो हा पुरस्कार स्वीकारेल आणि आमच्यासारखे त्याचा हात धरलेले हा पुरस्कार आपल्यालाही मिळालाय या आनंदात हवेवर स्वार होतील.
           मेधा उज्जैनकर,
                         धुळे.



Saturday, 14 May 2022

 

धमाल राजू

साडीची घडी करायला घेतली की हटकून तो आठवतोच, साडीची घडी कशी घालावी हे सांगणारा. ते सांगताना हातात साडी नसते पण असा बेमालूम दाखवतो घडीचं प्रात...