साडीची घडी करायला घेतली की हटकून तो आठवतोच, साडीची घडी कशी घालावी हे सांगणारा. ते सांगताना हातात साडी नसते पण असा बेमालूम दाखवतो घडीचं प्रात्यक्षिक की ज्याचं नाव ते. मुलांना शिकवता शिकवता त्याने आईलाही शिकवलं. मीही शिकलेच. चष्मा कसा धरावा म्हणजे त्याची काडी वाकणार नाही याचं शास्त्र चष्मेबहाद्दरांना न सांगता त्याने मुलांना सांगितलं. पहिल्यांदा भेटला तो मेळघाटावरील लिखाणातून. नंतर म्हणाला, "भेळ हे आंतरभारतीचा नमुना आहे." पटवून देण्यात वस्ताद. 'धमाल' करण्यात मग्न. प्रत्यक्ष त्याची भेट झाली ती जळगावी. लेखक जयंत पाटील यांच्याकडे. मी काहीतरी सादर केलं होतं. तेव्हापासून मैत्रीचा हात पुढे. मग शाळेत कार्यशाळा घ्यायला आला.
वलयांकित नाव राजीव तांबे. सोबत त्याच्या चिनी म्हणी म्हणून खपवलेल्या स्वतःच्या झणझणीत अंजनघालू ओळी. 'मुला बोले, आईबापा लागे' छापाच्या. उंचीच्या प्रमाणात जरा जास्त गुबगुबीत ( तो रागावणार नाही.)असा राजीव एक भला मित्र आहे. पहिल्यांदा घरी मुक्कामाला आला, कुरकूर न करता राहिला. जमिनीवर पथारीही त्याला चालली. भरपूर पुस्तकं घेऊन आला, आजवर त्याने हिशोब विचारला नाही. त्याच्या बोलण्याने मुलं खूष, पालकही खूष. क्रियापद शिकवणार ते लक्षात राहणारच.
कित्ती फिरतो हा धमाल राजू! चष्म्याआडून त्याचे डोळे विसंगती, चमत्कृती हेरत असतात. विषयही एक का असतो ? सगळ्या विषयांवर सहज बोलतो. सोप्पंय म्हणतो. बहुधा विषयच त्याच्याकडे येत असावेत, आम्हाला गोंजार रे, सोपं कर जरा असं म्हणत. तो तसं करतोही.
त्याच्याशी बोलायला लागलो की माणूस ताजा होणारच. वादच नाही. त्याच्या एकूण वागण्यावरून तो जरासा गबाळा आहे असं वाटतं. पण नाही,तो एकदम शिस्तशीर, वक्तशीर आहे. स्वतःच्या शिक्षणाचा उल्लेख तो बरेचदा करतो खरा पण कुणीच ते लक्षात घेत नाही.कारण तो सगळ्याच्या पार, मुलांमध्ये रमणारा,गाढ स्नेह राखणारा गोबरा धमाल राजू आहे. त्याच्या सोबत शुभलक्ष्मी आहेच, आपुलकी असणारी.
डॉ. मेधा उज्जैनकर,
धुळे.


No comments:
Post a Comment