हा गोड म्हातारा १९९१ पासून माझ्या खनपटीला बसला आहे.त्याला ९१ मध्ये भेटले काय आणि बास!पण तेव्हा तो म्हातारा नव्हता.त्याच्या नावाभोवतीचं वलय,मी त्याला भेटायला जाणार आणि गेले.महात्मा फुले वस्तु संग्रहालयाच्या कार्यालयात.थेट त्याच्या बाजूच्या खुर्चीत बसवून घेतलं.चर्चा कशावर तर परिभाषेवर.परिभाषा हा शब्द मला त्याच्यापर्यंत घेऊन गेला.तेव्हापासून जो त्याचा हात धरलाय तो काय सोडायला?
स्पष्ट विचार,थेटपणे बोलणं,मध्येच मिश्किल टिप्पणी करणं,सगळ्यांना अरे म्हणून बोलावणं पण मला मात्रहा आत्ता आत्ता अग म्हणू लागलाय. लहानपणापासून हेवा वाटावा इतका वाचतोय.आण मग लिहितो कधी? त्याची पुस्तकं येतातच आहेत.त्यात खंड नाही. विषय कुठलाच वर्ज्य नाही पुन्हा.स्वतः वाचायचं पण लोकालाही सवय लावायची हे छान जमतं त्याला.एक दिवस शहाणपणा करून मी त्याला म्हटलं,"मी तुमची पुस्तकं आवरून देते." म्हणे,"आवर." मी फक्त मनातल्या मनात आवरली पुस्तकं. कोणतं पुस्तक कुठे आहे,कशावर आहे सगळं मेंदूत फीड केलेलं. दगडधोंड्यांचा मास्तर असलेला हा म्हातारा पोस्टाच्या तिकिटावरही बोलतो, सिनेमावरही बोलतो,प्रेमावरही बोलतो, युद्धावरही बोलतो,विज्ञान तर हातखंडाच.तो क्रिकेटवर लिहितो,इतर खेळांवर लिहितो.काही गरज आहे इतकं सगळ्याच क्षेत्रात शिरायची?इतकी जिवावरची आजारपणं झेलून?नवीन काहीतरी चालूच.कुणी आपणहून त्याचा हात सोडला तरच,नाहीतर ज्याने याचा हात धरला तो तरून जातोच.निरनिराळ्या परिषदांच्या आयोजकांना नाव सुचवेल,पारितोषिक समितीला नाव सुचवेल आणि समोरच्याला इतका विश्वास की याने सुचवलेल्या नावाला ते सन्मानित करतीलच.कुणा अभ्यासकाचा विषय लक्षात ठेवून त्याला संदर्भ देणं,पुस्तकं राखून ठेवत ती आठवणीने देणं हे तो सहज करतो.बोलणं परखड.एक बरंय,कुणी या गोड आणि खडूस म्हाताऱ्याचं नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सुचवत नाही ते.आयोजक गारद होणार म्हणजे होणार.
त्याच्या चित्रशाळेच्या फ्लॅटवर आम्ही गेलो होतो,जमिनीपासून छतापर्यंत पुस्तकच पुस्तकं.जीव दडपलाच.आज मी हक्काने पुस्तकं आणते, परत नाहीच करत. तेव्हा असलेलं निरंजन घाटे या नावाभोवतीचं वलय,दबदबा आणि माझं नवखेपण.आता मी निर्ढावलेय.(त्याला मी गोड म्हातारा म्हणतेय त्यावरून लक्षात आलंच असेल.)केव्हाही त्याच्या घरी जाते.सविताताईंच्या हातचा छान चहा पीत,खायलाही असतं,गप्पा होतात.म्हणजे बोलतो हाच, माझी श्रवणभक्ती.त्याच्याशी असलेल्या इतक्या वर्षांच्या स्नेहाच्या जोरावर मी बाहेर मोठेपणा मिरवते.
माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्याला बोलवायला गेले.तब्येत यथातथाच होती.पण येतो म्हणाला.थोड्या वेळाने तब्येतीमुळे जमणार नाही,भाषणाचा व्हिडिओ पाठवून देतो म्हणाला.मला ते दिसत होतच.त्यासाठी हॉलमध्ये सगळा जामानिमा केला.आणखीही मान्यवर येणार होते.एकदम धाकटा मोठ्याने म्हणाला,"आई,बघ कोण?"मी दाराशी.पाहते तर सविताताईंच्या मागे काठी टेकत साक्षात हा बाबा रिक्षातून उतरून येतोय.मनातल्या मनात ढोलताशे वाजवून घेतले.हा गोडुस म्हातारा आला, पुस्तकाचं प्रकाशन केलं, नेहमीप्रमाणे कौतुक केलं.गेला.
२७ मे रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्याला गौरविण्यात येणार आहे.निर्लेप वृत्तीने तो हा पुरस्कार स्वीकारेल आणि आमच्यासारखे त्याचा हात धरलेले हा पुरस्कार आपल्यालाही मिळालाय या आनंदात हवेवर स्वार होतील.
मेधा उज्जैनकर,
धुळे.

No comments:
Post a Comment